समर्पण –
समर्पण हे आपल्या जीवनातील वैराग्याची खरी कसोटी असते. जोपर्यंत आपल्या मनामध्ये स्व किंवा मी जिवंत आहे, तोपर्यंत आपल्याला पूर्णतः समर्पित होता येत नाही. समर्पणासाठी मी ची भावना पूर्णपणे नष्ट व्हावी लागते. पती-पत्नीच्या जीवनामध्ये समर्पित भाव, हा त्यांच्या वैवाहिक जीवनाचा भक्कम पाया असतो. एकमेकावर अवलंबून राहणे वेगळे, आणि एकमेकावर समर्पित होणे वेगळे, हा फरक आपल्याला संसाराच्या सुरुवातीलाच कळायला हवा.
आपण एकमेकावर अवलंबून आहोत, या भावामध्ये परावलंबन आहे आणि कोणत्याही परावलंबनाच्या तळाशी भीती असते आणि ही भीती आपल्या वैवाहिक जीवनाच्या आनंदा मधला सर्वात मोठा अडथळा असतो.
समर्पित भावामध्ये विश्वास असतो आणि विश्वास हा नेहमी निर्भय असतो. आपण पण खरोखर समर्पित आहोत का ? हे तपासायचे असेल तर त्याची एकच परीक्षा आहे, पतीच्या जीवनातील वेदना आणि दुःख, हे पत्नीला स्वतःचे वाटले पाहिजे आणि पत्नीच्या जीवनातील वेदना व दुःख पतीला आपले वाटले पाहिजे.
समर्पणामध्ये स्वतःची इच्छा, भावना, अपेक्षा यांची पती-पत्नीनी एकमेकांसाठी आहुती द्यायची असते. जगणं असतं ते दुसऱ्यासाठी आणि वागणं असतं ते स्वतःसाठी. समर्पणामध्ये जगणं आणि वागणं यामध्ये समन्वय असतो. समर्पित भाव काय असतो ? याचे सर्वोत्तम ऐतिहासिक उदाहरण म्हणजे, माँसाहेब जिजाऊ आणि शहाजी राजांचे जीवन आहे. या जगप्रसिद्ध ऐतिहासिक दाम्पत्याने समर्पणाचा एक आदर्श समाजापुढे उभा केला आहे. या दोघांच्याही जीवनामध्ये कोठेही वैयक्तिक स्वार्थ शिल्लकच राहिलेला नव्हता. खरे सुख भोगामध्ये नसून त्यागामध्ये आहे आणि समर्पण त्यागाशिवाय अशक्य आहे.
विश्व माऊली ज्ञानदेवांचे माता पिता, रुकमणीमाता व विठ्ठलपंत यांच्या जीवनातील समर्पित भाव अगदी स्वतःला देहांत प्रायश्चित्त घेत असताना सुद्धा अढळपणे दिसून येतो.
आज पती-पत्नीमध्ये समर्पणाऐवजी एकमेकावर उपकार करण्याचा भाव आणि उपकार केल्याचा भाव जास्त दिसून येतो. सर्वात महत्त्वाचे म्हणजे समर्पणात परतफेडीची कोणतीच अपेक्षा नसते, तर उपकार परतफेडीची अपेक्षा ठेवतो.
जेथे समर्पण आहे तेथे कर्तव्य प्रधान असते आणि जेथे उपकार आहे तेथे हक्क प्रधान असतो. हक्क डोक्यात आला की कर्तव्याचा विसर पडतो आणि पती-पत्नीच्या जीवनातील हेच सर्व वादाचे मूळ आहे.
देह समर्पिजे देवा l भार काहीच न घ्यावा l होईल अवघा l तुका म्हणे आनंद ll
डॉ. आसबे ल.म.
अध्यक्ष कामधेनू सेवा परिवार.