अस्तित्वाची नोंद –
सज्जन माणसे राजकारणात पडत नाहीत, चुकून एखादा या क्षेत्रात गेला तर त्याला राजकारणी टिकू देत नाहीत आणि त्याचे समाजकारण चालू देत नाहीत. पक्षविरहित आणि राजकारणविरहित सेवा समाजाला अपेक्षित असते. समाजसेवा करणारी माणसे निष्ठेने, प्रामाणिकपणाने हे कार्य करीत असतील, तर त्यांच्या भोवती समाज गोळा होतो. समाजाला अशा व्यक्तीकडून खरोखर अपेक्षा वाटू लागते. अशा व्यक्तीच्या भोवती गर्दी जमू लागली, की राजकारणी लोकांचे पित्त खवळते. दुर्लक्षित होणे, हे राजकारणातील दारिद्र्य आहे.
आपल्यापेक्षा दुसऱ्याला महत्त्व आले, की असे राजकारणी लोक, त्या लोककल्याणकारी व्यक्तिचे, त्याची काहीही चूक नसताना आणि त्याचा कोणताच दोष नसताना शत्रू बनतात. हा काळ सज्जन लोकांच्या आणि समाजसेवकांच्या जीवनातील अतिशय महत्त्वाचा आणि कसोटीचा काळ असतो. त्यांच्या जीवनातील सत्यवाची परीक्षा याच काळात होत असते.
विश्व माऊली ज्ञानदेवांना शुद्धिपत्र मागणारे, तुकोबारायांची गाथा इंद्रायणीत बुडविणारे, नाथ महाराजांच्या अंगावर थुंकणारे हेच लोक होते. कर्मवीर भाऊराव पाटील यांना आत्महत्येचा विचार डोक्यात आणायला कारणीभुत ठररणारे हेच लोक होते.महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई यांच्या अंगावर शेण टाकणारे, हेच लोक होते. याचा अर्थ राजकारण आणि राजकारणी यांच्या तावडीतून कोणाचीही सुटका होत नाही.
आपण स्वार्थी बनलो तर ते आपल्याला त्यांचा अनुयायी किंवा समर्थक बनवतात. आपण निःस्वार्थी वृत्तीने समाजात, समाज सेवा करत राहिलो, तर ते आपले शत्रू बनतात. त्यात आपला काहीच दोष नसतो. ज्याचा स्वतःवर विश्वास असतो, तो या महापुरातही ठामपणे , अढळ उभा राहतो. त्याचेच चरित्र बनते आणि जगाला ते दिशा देते. बाकीचे जन्माला येतात आणि प्रवाहाबरोबर वाहून जातात. यांची नोंद फक्त सरकारी दप्तरी जन्मल्याची असते आणि शेवटी मेल्याची असते.
आपण कोणत्या वर्गात उभे राहायचे हे आपल्याच हातात आहे.
जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती l
देह कष्टविती परोपकारे ll
भुतांची दया हे भांडवल संती l
आपुली ममता नाही देही ll
डॉ. आसबे ल.म.