भय इथले संपत नाही –
आज संपूर्ण समाज भीतीच्या छायेखाली आहे. माणसाच्या मनात भीती निर्माण झाली की आनंद, सुख, समाधान, शांती या गोष्टी जीवनातून निघून जातात. एक वेळ माणूस ते सहन करेल परंतु भीती निर्माण झाल्यानंतर निघून जाणारा उत्साह, हात-पाय गळाल्यामुळे कमी झालेली क्रियाशीलता, यामुळे जे नुकसान होते, ते सर्वात जास्त असते.
मनात भीती असणारा माणूस कधीही, कोणत्याही कामात एकाग्र होऊ शकत नाही. ज्या कामात आपण एकाग्र होऊ शकत नाही, ते काम आपण कधीही आपल्या पूर्ण क्षमतेने करू शकत नाही. कोणतेही काम एकाग्रतेने केले, तर ते आपल्या कुवतीप्रमाणे सर्वोच्च ठरते. निर्भयतेशिवाय एकाग्रता येऊच शकत नाही.
आज कोरोनाच्या काळात प्रत्येकाची एकाग्रता भंग पावलेली आहे. याचा शेवट काय होणार ⁉️ याचे भाकीत कोणीच करू शकत नाही. रोगाच्या भीतीपेक्षा औषधांचा तुटवडा आणि वैद्यकीय सेवेची मर्यादा, या गोष्टी माणसाला जास्त काळजीत टाकणाऱ्या आहेत. काळजी करणारे आणि घाबरलेले मन आपोआप नैराश्यग्रस्त होते. नैराश्यता ही कोणत्याही रोगाला पोषक ठरते. आज आपल्याला यातून सुटावे, असे प्रत्येकाला वाटत आहे, परंतु काय करावे ⁉️ हे समजत नाही.
आपली रोगप्रतिकारक शक्ती हीच यावरती रामबाण उपाय आहे. पोस्टीक आहार, नियमित व्यायाम आणि शासनाने सुचवलेले सर्व नियम पाळा. आज तरी आपल्या हातात हाच एकमेव उपाय आहे. मरणाची भीती कोणत्याही औषधाने जात नाही, मरणाची भीती जाण्यासाठी जीवनामध्ये अध्यात्माची गरज आहे.
देव माना अथवा न माना, पण मृत्यूची भीती तर सर्वांना मान्य आहे आणि तिच्यावर आध्यात्म हाच एकमेव उपाय आहे.
अध्यात्म म्हणजे आत्मस्वरूपाचे ज्ञान, हा साक्षात्कार होताच देहाच्या मर्यादा आणि त्याची नश्वरता याचे ज्ञान होते. जीवनातील कोणतीही भीती, ही देहाशी संबंधित आहे. एकदा देह कधीतरी निश्चित मरणार आहे, हे माहीत झाले आणि मान्य झाले की मन त्याचा स्वीकार करते.
जीवनात येणारी कोणतीही भयानक गोष्ट, एकदा मनाने स्वीकारली की हळूहळू तिची भीती आपोआप कमी होते. निर्भयता_ हीच जीवनातील सर्वात मोठी प्रतिकारकशक्ती आहे आणि हीच जीवनातील खरी श्रीमंती आहे. ही आपल्याकडे नसेल तर, आपल्याकडे कितीही पैसे असले तरी आपण सर्वात जास्त दरिद्री आहोत. कोणताही साधा रोग आपला बळी घेतल्याशिवाय राहणार नाही.
शांती परते नाही सुख l
येत अवघेचि दुःख ll
म्हणवोनि शांती धरा l उतराल पैल तिरा ll
खवळलिया काम क्रोधी l अंगी भरते आधीव्याधी ll
तुका म्हणे त्रिविध ताप l
मग जाती आपोआप ll
ही शांती/peace निर्भयतेशिवाय जीवनात येत नाही.
डॉ. आसबे ल.म.