पेपर कसा वाचावा ??
सर्वात आधी पेपर एकत्र करावा ज्याची पुरवणी टेबल वर मिळेल, मुख्य पान सोफ्यावर आणि मधल पान आईने चपात्या ठेवायला घेतलं असेल कारण तिला वाटलं पेपर कालचा आहे. जर काल आयपीएल किंवा आंतरराष्ट्रीय मॅच असेल तर पेपर मागून वाचला जातो अथवा काल निवडणुकांचे निकाल लागले असतील तर पेपर पुढून वाचला जातो.
पेपर उघडताच पाहिलं पानभर बिल्डर ची जाहिरात असेल त्यातल्या तुम्ही फक्त किमती पाहणार आणि पुढचं पान उघडणार. पंखा सुरू असल्यामुळे पेपर उडणार पण तुम्ही आळशी असल्याने तुम्ही तसच दुसरा हाथ ठेऊन वाचणार नंतर दोन पानं झाले की जो बटणा जवळून जातोय त्याला पंखा बंद करायला सांगणार.
पहिल्या पानावर मुख्य बातमी मध्ये कुठतरी मोदींचा फोटो अथवा नाव असणार ते पाहून शिवी देऊन तुम्ही डावीकडे पाहणार तिथं बद्धकोष्ठता आणि इतर पोटांच्या विकारांची जाहिरात असणार. खालच्या बाजूला एखादी सकारात्मक बातमी असणार जस रिक्षावाल्याने सापडलेली पर्स आणि महागडा साडेपाच हजार रुपयांचा मोबाईल तरुणीला घरी जाऊन परत केला. माणुसकीचं दर्शन.
पान पलटल्यानंतर कारण नसताना दोन नंबर च पान तुम्ही इग्नोर करणार थेट पेज थ्री वर जाणार जिथं डावी बाजू वाचायला लागल्यानंतर तुम्हाला लक्षात येत काल तुम्ही राहता त्या सोसायटी समोर ४ अल्पवयीन तरुणांनी एकाचा निर्घृण पूर्ववैमनस्यातून खून केलाय. पण त्याच वेळी तुम्ही आमरस बनवण्यासाठी आंबे कापत होता. पुढच्या बातमी मध्ये नवऱ्याने बायकोला कार घेण्यासाठी माहेरहून पैसे आणावे म्हणून हान हान हानलेल अस्त तुम्ही बायकोकडे पाहता आणि पुढची न्यूज वाचता.ज्यात ५ रुपयांसाठी एकाने दुसऱ्याचा कान चावलेला असतो.
पुढचं पान संपादकीय तुमच्या आणि माझ्या कैक पिढ्यांनी या पाणाला दुर्लक्षित आणि वंचित ठेवलय. ( सामना अपवाद ). संपादक त्याच म्हणणं लोकांनी वाचावं म्हणून कार्टून टाकतोय, वाचकांचं मनोगत टाकतोय तरी लोक बाकीचं वाचून याचा कॉलम मात्र कोलतात.
पुढचं पान छोट्या जाहिराती यात कोरेगाव पार्क पासून हाकेच्या अंतरावर २ लाख रुपये एकर ने जमीन मिळतिये, एका फार्म हाऊस साठी आचारी हवाय ज्याला पगार ८ हजार मिळेल पण व्हेज, नॉन व्हेज, चायनिज, मॅक्सिकन फूड बनवता यायला हवं. वधू पाहिजे मध्ये मुलगा नेव्ही मध्ये असतो वर पाहिजे मध्ये मुलगी ४२ वर्षांची असते अपेक्षा :- मुलगा निर्व्यसनी, सरकारी नोकरी आणि पुण्यात घर आणि वर ३० पेक्षा जास्त नको.
पुढचं पान स्पोर्ट्स च इथ महिला १ सेकंद न व्यर्थ करता पेपर बंद करतात पुरुष डावीकडे आयपीएल तक्ता आणि काल मॅच पहिली असली तरी परत पूर्ण बातमी वाचता. खाली कार ची जाहिरात असते त्या कार चा ई.एम.आय आणि तुमचा पगार यात ई.इम.आय जास्त असतो. नंतर तुम्ही पुरवणी घेता वाचायला आणि पेपर पुन्हा एकदा सोफ्यावर जातो पुरवणी टेबल वर आणि तुम्ही आंघोळ करायला.
मनोज शिंगुस्ते
लेखक ज्येष्ठ वृत्तपत्र वाचक आहेत (वाचनाचा २५ वर्षे अनुभव )