वारसा –
वारसाहक्काने वडिलोपार्जित जमीन जुमला, संपत्ती सर्वांनाच कायद्याने प्राप्त होत असते, याच्यासाठी घरात वाद नसतील तर फारसे प्रयत्न करावे लागत नाहीत, ते आपोआप होते. आपल्या जीवनात अभिमानाने सांगावा असा एखादा पूर्वजांचा वारसा आपल्याकडे जरूर असावा. अनुवंशिकतेने अनेक पिढ्यांचे गुण आपल्या शरीरामध्ये येत असतात, त्याचा विकास करणे आपल्या हातात असते.
आपली जमीन, घर किंवा संपत्ती ही आपली ओळख होऊ शकत नाही. त्यामुळे वारसाहक्काने मिळालेल्या या गोष्टी आपल्यासाठी जगण्यासाठी आवश्यक असल्या तरी, यावरून आपली ओळख होत नाही.
आपली ओळख आपल्या वैयक्तिक कर्तुत्वाने होत असते. आपले कर्तृत्व सिद्ध करण्यासाठी आपल्याकडे काहीतरी वैशिष्ट्य असावे लागते आणि हे वैशिष्ट्य आपल्याला अनुवंशिकतेने मिळालेले असते. ज्याला जीवनात आपल्यात असलेल्या या विशिष्ट गुणांचा शोध लागतो, त्याच्या जीवनात या गुणांचा विकास, हीच त्याची ओळख ठरते आणि हाच खरा वारसा असतो.
आपल्याला मिळालेला वारसा, हा कोणालाही तोंडाने सांगावा लागत नाही कारण तो प्रकट झाल्याशिवाय रहात नाही.
आपल्यातील वैशिष्ट्य आपण अंतर्मुख झाल्याशिवाय आपल्याला सापडत नाही. जीवनात बहुतांशी वेळा आपण दुसऱ्याची कॉपी करत असतो किंवा दुसऱ्याची कॉपी करून जगत असतो.
जोपर्यंत ही कॉपी करायची आपण थांबत नाही, तोपर्यंत देवाने आपल्याला काय दिलेले आहे ? अनुवंशिकतेने आपल्या पूर्वजांनी आपल्याला काय दिलेले आहे ? आणि आपल्या जीवनामध्ये विशिष्ट असे काय आहे ? याचा आपल्याला शोध लागत नाही.
ज्या दिवशी जीवनातील कॉपी बंद होते, त्यादिवशी आपला स्वतःचा शोध स्वतःत सुरू होतो. भगवंताने कोणालाही रिकामे किंवा मोकळे पाठवलेले नाही. त्याने आपल्याला भरभरून दिलेले आहे, दुर्देवाने आपण त्याकडे पाहिलेले नसते, म्हणून आपल्याला ते सापडत नाही.
स्वतःचा शोध स्वतः सुरू झाला की अनेक अलौकिक कला- गुणांचे भांडार आपल्यासाठी उघडे होते आणि आपल्या जीवनात किती मोठा वारसा आपल्याला मिळालेला आहे⁉️ याचा शोध लागतो.
हा वारसा म्हणजे आपली खरी ओळख आहे आणि आपल्या पूर्वजांचा आणि कुळाचा खरा दिशादर्शक दिवा आहे. असे ज्यांचे जीवन आहे तोच खरा कुलदीपक आहे. बाकीचे सगळे फक्त दिवटे आहेत.
डॉ. आसबे ल.म.