संबंध आणि नाती –
संबंध आणि नाती ही जपावीच लागतात कारण यांच्याशिवाय या जगात आपल्या असण्याला काहीच अर्थ उरत नाही. संबंध आणि नाती याच्यामध्ये फरक आहे.
संबंध आवडीने जोडलेले आणि जोपासलेले असतात, नाती काहीवेळा नाईलाजाने जपावी लागतात. नात्याचे ओझे वाटू लागले की त्या नात्यात जिव्हाळा आणि प्रेम राहिलेले नसते. संबंध जोडणे सोपे आहे, पण तो टिकवणे खूप अवघड आहे, कारण त्यासाठी वेगळा वेळ काढावा लागतो आणि त्याग करावा लागतो. ज्याच्याशी संबंध जोडला आहे, त्याच्याबद्दल कोणताही स्वार्थ मनात उत्पन्न होऊ नये, याच्यासाठी अट्टाहासाने प्रयत्न करावा लागतो, यालाच त्याग म्हणतात.
नात्यांचा उगमच स्वार्थातून झालेला असतो, त्यामुळे यात त्यागाला काहीच किंमत नसते. या कारणामुळेच नाती टिकवताना माणसाची दमछाक होते. नात्यात त्याग करायची कोणाचीच इच्छा नसते. त्याग करणारा यात लुटला जातो आणि स्वार्थी माणूस यात स्वतःला शहाणा समजत असतो.
नाते गरजेनुसार जोडलेले असते आणि गरज संपताच त्याला सांभाळणे खूप अवघड असते. त्यामुळे कोणत्याही नात्याचा शेवट हा वेदनादायी ठरतो.
संबंध हृदयाने हृदयाशी जोडलेले असतात, ही हृदयाची भूक असते, त्यात गरजेला शून्य स्थान असते. त्यामुळे संबंधाचे ओझे कधीच वाटत नाही आणि जोडलेला संबंध तुटतही नाही, म्हणून जीवनामध्ये नाती तयार करण्यापेक्षा संबंध जोडावेत. या जीवनामध्ये मित्रत्वासारखा दुसरा संबंध नाही, म्हणून जगातील प्रत्येक जीव मित्रत्वासाठी भुकेलेला आहे. आपल्याला जगन्मित्र होता आले पाहिजे, नाही कोणाशीच संबंध जोडत आला तर ज्याचा संबंध कधीच तुटत नाही आणि कोणालाही तोडता येत नाही, अशा अविनाशी तत्त्वाशी म्हणजेच भगवंताशी संबंध जोडावा.
आपुला तो एक देव करुनी घ्यावा l
तेणे विना जीवा सुख नाही ll
येर ती माईके दुःखाची जनीती l
नाही आधी अंती अवसानी ll
अविनाश करी आपुलिया ऐसे l
लावी मना पिसे गोविंदाचे ll
तुका म्हणे एका मरणेची सरे l
उत्तमची उरे किर्ती मागे ll
डॉ. आसबे ल.म.
अध्यक्ष कामधेनू सेवा परिवार.