जबाबदारी –
जबाबदारी ही आपल्या व्यक्तिमत्त्वाचा एक अविभाज्य भाग आहे. आपल्या व्यक्तिमत्त्वाचा विकास जबाबदारीला वगळून मोजता येत नाही. ज्या व्यक्तीच्या जीवनात जबाबदारी प्रधान आहे ती व्यक्ती सदासर्वकाळ लोकप्रिय राहते आणि मृत्यूनंतरही त्या व्यक्तीची कीर्ती बराच काळ गाजत राहते.
वैवाहिक जीवनामध्ये कौटुंबिक जबाबदारीचे भान ज्या व्यक्तीकडे आहे त्या व्यक्तीला कुटुंबियांचे प्रेम मिळते. व्यक्तिगत जीवनात पती-पत्नी जबाबदारीने बांधलेले असतील, तर त्यांच्यामध्ये अद्वैत भाव असतो. ज्या पती-पत्नीमध्ये बेफिकिरी आणि जबाबदारी असते त्यांच्यामध्ये द्वैतभाव निर्माण होतो. अशा दंपत्यामध्ये जबाबदारी एकमेकावर ढकलून देण्याचा प्रकार सुरू होतो, काही काळानंतर यात स्पर्धा सुरू होते. जिंकणारा मस्तीत जातो आणि हरणारा स्वतःला अन्यायग्रस्त आणि अत्याचारित समजतो. अशा मानसिकतेत संसाराची घडी कधीच नीट बसत नाही.
वैवाहिक जीवनामध्ये गंगा आणि अग्नीला साक्षी ठेवून आपण एकमेकांना स्वीकारलेले असते. ज्यांना स्विकारलेले असते त्यांची जबाबदारी आपोआप आपल्याकडे येत असते. पत्नी आपले माहेर, जिव्हाळ्याची माणसे, आपले आडनाव, हे सर्व सोडून पतीची अर्धांगिनी झालेली असते.
तुका म्हणे एका देहाचे अवयव l सुखदुःख जीव भोग पावे ll
पत्नीच्या जीवनातील दुःखाची वेदना, पतीला झाली पाहिजे आणि पतीच्या जीवनातील दुःखाची वेदना, पत्नीला झाली पाहिजे, हा वैवाहिक जीवनातील अद्वैत भाव आहे.
आज बहुतांशी एकुलती एक मुले आहेत. अशा एकुलत्या एक मुलाला आपल्या पत्नी बरोबरच आईवडिलांची जबाबदारीही घ्यायची असते आणि ती घ्यायलाच हवी. अशा अवस्थेत पतीच्या आई वडिलांचा तिरस्कार करणारी पत्नी, त्या मुलासाठी गळ्यातील लोढणे बनते. त्रास होतोय म्हणून जे काढूनही टाकता येत नाही आणि लोढणे गळ्यात घेऊन संसाराचा गाडा पुढे ओढताही येत नाही.
पतीच्या मनाचा विचार करणारी पत्नी आणि पत्नीच्या मनाचा विचार करणारा पती, ही दोघांची समान अपेक्षा असते, यात गैर काहीच नाही. पतीने आपली आई रडली नाही पाहिजे आणि आपली पत्नी रुसली नाही पाहिजे, यासाठी दक्ष असावे. पत्नीने आपल्या पतीची मानसिक अवस्था कायम प्रसन्न राहील, उत्साही राहील, त्याचे जीवन चैतन्यमय राहील, याच्यासाठी दक्ष असावे.
महाराणी सईबाई साहेब यांनी मृत्युशय्येवर असताना सुद्धा शिवरायांना अफजलखान फाडण्याचे बळ दिले. जिजाऊ आऊ साहेबांनी शहाजीराजांना स्वतंत्र राज्य निर्माण करण्याचे सामर्थ्य दिले. आपला दीर आणि सख्खा भाऊ दौलताबादच्या किल्ल्यावर ठार झाले. आपल्या वडिलांनी स्वतःचा जावई असलेल्या शहाजी राजांवर वार केला, तरीही माँसाहेब जिजाऊ यांनी आपली कौटुंबिक जबाबदारी आणि वैवाहिक जबाबदारी ज्या पद्धतीने पार पाडली त्याला इतिहासात तोड नाही. पत्नीचा प्रसन्न चेहरा, प्रेमळ आणि धीराचे बोलणे, जगात हरलेल्या पतीला वाघाचे काळीज आणि हत्तीचे बळ देऊन जाते.
जगात जिंकलेला पती घरी आला आणि पत्नी जर कर्कश्य बोलत असेल, टोचून, टाकून बोलत असेल, सतत वैतागलेली, रुसलेली, दुराग्रही आणि हट्टी असेल, तर असा जग जिंकणारा पती सुद्धा घरात येताच शेळपट बनल्याशिवाय रहात नाही.
जग जिंकणारा दशरथ राजा, प्रभू रामचंद्रांना राज्याभिषेक करण्याचा निर्णय घोषित करणारा राजा, कैकयीच्या महालात येताच, त्याची अवस्था अतिशय दयनीय झाली आणि संपूर्ण रामायण घडले. कैकयी त्या काळात आपली जबाबदारी विसरली. दशरथाने दिलेले वचन पूर्ण करून आपली जबाबदारी निभावली, पण त्यात स्वतःचा अंत करून घेतला.
जबाबदारीचे भान पती-पत्नीमध्ये समसमान असायला हवे. दोघांनाही आपली एकमेकांना साथ आहे, हा भाव खात्रीने वाटला पाहिजे. ज्या दिवशी पती किंवा पत्नी एकमेकांना बोज वाटतील, त्यादिवशी वैवाहिक जीवनाचा अंत झालेला असतो आणि उरलेली असते ती फक्त तडजोड आणि गरज.
कौटुंबिक जबाबदारी बरोबरच सामाजिक, राष्ट्रीय, धार्मिक आणि भावनिक जबाबदारी आपल्याला वेळेत समजायला हवी. या जबाबदाऱ्या जेवढ्या लवकर समजतील तेवढे आपले व्यक्तिमत्व समृद्ध होत जाते. जबाबदारीची जाणीव घरातून सुरू होऊन ती विश्वव्यापक झाली, तर खरा आपला विकास झाला असे समजावे अन्यथा जन्माला आला हेला आणि कसा तरी जगून मेला असेच आपले जीवन होऊन जाते.
डॉ. आसबे ल.म.
अध्यक्ष कामधेनू सेवा परिवार.