श्रीमद् भगवद् गीता भाग २३ –
अध्याय २ – सांख्ययोग – श्लोक क्र.२.४१ ते २.४४ | श्रीमद् भगवद् गीता भाग २३.
मूळ श्लोक –
व्यवसायात्मिका बुद्धिरेकेह कुरुनन्दन ।
बहुशाखा ह्यनन्ताश्च बुद्धयोऽव्यवसायिनाम् ॥ २-४१ ॥
संदर्भित अन्वयार्थ –
कुरुनन्दन = हे कुरुवंशी अर्जुना, इह = या कर्मयोगामध्ये, व्यवसायात्मिका = निश्चयात्मिका, बुद्धिः = बुद्धी, एका = एकच, (भवति) = आहे, (परन्तु) = परंतु, अव्यवसायिनाम् = अस्थिर विचार करणाऱ्या विवेकहीन सकाम मनुष्याच्या, बुद्धयः = बुद्धी, हि = निश्चितपणे, बहुशाखाः = पुष्कळ भेद असणाऱ्या, च = आणि, अनन्ताः = अनंत, (सन्ति) = असतात ॥ २-४१ ॥
अर्थ –
हे अर्जुना, निष्काम कर्मयोगात एकच व्यवसायात्मक म्हणजेच निश्चयात्मक बुद्धी असते व निश्चय व परिणामही एकच असतो. यामुळे आत्मिक संपत्तीचा विकास होतो. ही आत्मिक संपदा स्थिर असते. ही आत्मिक संपदा प्रकृतीच्या दृंद्रामध्ये हळूहळू स्थापित करणे यालाच व्यवसाय किंवा निश्चय म्हणतात. परंतु ज्यांच्याजवळ ही निश्चयात्मक बुद्धी नसते, म्हणजे जे लोक अनेक प्रकारच्या इच्छा ठेवतात, ते लोक भजन-पूजन करू शकत नाहीत असे श्रीकृष्णांचे म्हणणे आहे कारण त्यांच्या बुद्धीला अनेक प्रकारचे फाटे फुटलेले असतात.
मूळ श्लोक –
यामिमां पुष्पितां वाचं प्रवदन्त्यविपश्चितः ।
वेदवादरताः पार्थ नान्यदस्तीति वादिनः ॥ २-४२ ॥
कामात्मानः स्वर्गपरा जन्मकर्मफलप्रदाम् ।
क्रियाविशेषबहुलां भोगैश्वर्यगतिं प्रति ॥ २-४३ ॥
संदर्भित अन्वयार्थ –
पार्थ = हे पार्था (अर्थात पृथापुत्र अर्जुना), कामात्मानः = जे भोगात तन्मय झालेले असतात, वेदवादरताः = कर्मफळाची प्रशंसा करणाऱ्या वेदवाक्यांमध्ये ज्यांची प्रीती आहे, स्वर्गपराः = ज्यांच्या बुद्धीला स्वर्गच परम प्राप्य वस्तू वाटते, (च) = आणि, (स्वर्गात् अधिकम्) = स्वर्गापेक्षा अधिक, अन्यत् = दुसरी (कोणतीही वस्तूच), न अस्ति = नाही, इति = असे, वादिनः = जे म्हणतात, (ते) = ते, अविपश्चितः = अविवेकी लोक, इमाम् = अशाप्रकारची, याम् = जी, पुष्पिताम् = पुष्पित म्हणजे दिखाऊ शोभेने युक्त, वाचम् = वाणी, प्रवदन्ति = उच्चारतात, (यां वाचम्) = जी वाणी, जन्मकर्मफलप्रदाम् = जन्मरूपी कर्मफळ देणारी, भोगैश्वर्यगतिं प्रति = भोग व ऐश्वर्य यांच्या प्राप्तीसाठी, क्रियाविशेषबहुलाम् = पुष्कळशा क्रियांचे वर्णन करणारी आहे, तया = त्या वाणीमुळे, अपहृतचेतसाम् = ज्यांची मने हरण केली गेली आहेत ॥ २-४२, २-४३ ॥
अर्थ –
हे पार्था, विषयभोगात तत्पर असणारे, वेदाच्या अर्थवादात रस असणारे, स्वर्गसुख हेच परमलक्ष्य मानून त्याखेरीज दुसरे मोठे सुख नाही असे समजणारे ब सांगणारे तुटपुंजे ज्ञान असणारे, असे अविवेकी लोक जन्ममृत्युफल देणारी व भोग व ऐश्वर्य यांच्या प्राप्ती संबंधात जिच्यामध्ये पुष्कळ कर्म सांगितले आहे अशी वेदवचने सांगतात व वेदाच्या पुष्पित, रोचक वाणीच्या आधाराने ते बोलतात. या अविवेकी लोकांची बुद्धी अनंत भेदांनी युक्त असते. त्यामुळे ते कर्मफल सांगणाऱ्या वेदवाक्यांना प्रमाण मानतात, स्वर्गाला श्रेष्ठ समजतात. त्यांची बुद्धी अनंत भेदांनी युक्त असल्याने ते अनेक कर्मकांडात मग्न असतात, ते परमेश्वराचे नाव घेत असतात, परंतु विविध कर्मकांड करीत असतात. मग ही कर्मकांडे, अनेक प्रकारची कर्मानुष्ठाने म्हणजे कर्म नव्हे का?
श्रीकृष्ण म्हणतात नाही कर्मकांडे म्हणजे कर्म नव्हे? मग ती एक निश्चित क्रिया आहे का? यावर त्यांनी येथे काही सांगितले नाही. ते एवढेच इथे म्हणतात की अविवेकी लोकांची बुद्धी अनंत भेदांनी युक्त असल्याने विविध प्रकारच्या कर्मकांडात ते व्यस्त असतात व त्यासाठी वेदवाक्याचे प्रमाण देऊन रोचक वाणीत ते आपले म्हणणे व्यक्तही करतात. मग याचा परिणाम काय होतो?
मूळ श्लोक –
भोगैश्वर्यप्रसक्तानां तयापहृतचेतसाम् ।
व्यवसायात्मिका बुद्धिः समाधौ न विधीयते ॥ २-४४ ॥
संदर्भित अन्वयार्थ –
भोगैश्वर्यप्रसक्तानाम् = जे भोग आणि ऐश्वर्य यांच्यामध्ये अत्यंत आसक्त आहेत, (तेषां पुरुषाणाम्) = त्या पुरुषांची, समाधौ = परमात्म्याच्या ठिकाणी, व्यवसायात्मिका = निश्चयात्मिका, बुद्धिः = बुद्धी (ही), न विधीयते = स्थिर असत नाही ॥२-४४ ॥
अर्थ –
हे अर्जुना, वेदाच्या अर्थवादात मग्न झालेल्या व वेदवाक्य प्रमाण मानून रोचक वाणीत बोलणाऱ्या लोकांच्या वाणीने प्रभावीत झालेल्या लोकांची विवेकबुद्धी नष्ट होते. त्यांना काहीही प्राप्त होत नाही. त्या वाणीने मोहित झालेले लोक इंद्रिय भोगात आणि भौतिक ऐश्वर्यात अतिशय आसक्त होतात. अशा पुरूषांच्या अंतःकरणात कार्याकार्याचा निश्चय करणारी बुद्धी उदभवत नाही. भगवंताच्या ठिकाणी दूढ होणारी, स्थिर होणारी बुद्धी त्यांच्यात निर्माण होत नाही.
अशा या अविवेकी लोकांची बाणी कोण ऐकते? तर भोतिक विषयभोगात-इंद्रिय भोगात व ऐश्वर्यात जे आसक्त झालेले आहेत तेच लोक अविवेकी लोकांचे बोलणे ऐकतात. अधिकारी, विवेकी, स्थिर बुद्धीचे लोक त्यांच्या बोलण्याने मोहित होत नाहीत, परंतु अविवेकी लोक मात्र मोहित होतात व त्यामुळे आत्मसुख देणारी, आदितत्त्वात प्रवेश देणारी निश्चयात्मक बुद्धी त्यांच्यात निर्माण होत नाही. त्यांचे चित्त आत्मज्ञानात कधीही स्थिर होऊ शकत नाही.
प्रश्न असा निर्माण होतो की , वेदवादरत:’ जे वेदाच्या अर्थवादात मग्न असतात तेही चूक करतात का? यावर श्रीकृष्ण म्हणतात-
क्रमशः श्रीमद् भगवद् गीता भाग २३.
लेखन / माहिती संकलन : रमेश साहेबराव जाधव.