वेदनेचे फळ –
जगात कोणतीही चांगली निर्मिती होण्यासाठी निसर्गाचे आणि भगवंताचे नियोजन असते, हे नियोजन म्हणजे बिघडलेली परिस्थिती असते. ज्या ठिकाणी वाईट आहे, त्या ठिकाणीच चांगल्याची गरज असते. अंधारात दिव्याची गरज असते त्याप्रमाणेच वाईटात चांगल्याची आवश्यकता असते.
या जगात जे जे महात्मे झाले, ते सर्व वाईट अवस्थेला मात करत करतच निर्माण झालेले आहेत. त्यामुळे जगात ज्यावेळी वाईट गोष्टीला उत येतो, त्यावेळी चांगल्याची निर्मिती होण्यासाठी पोषक वातावरण तयार होत असते, हा निसर्गाचा नियम आहे.
आपल्या जीवनात आपणही चांगले काहीतरी करावे, असे प्रत्येकाला वाटत असते, परंतु त्यासाठी आपल्या जीवनात पोषक वातावरण तयार होण्यासाठी वाईटाचा अनुभव घ्यावा आणि यावा लागतो, ही मानसिक तयारी कोणाची नसते. संत, समाजसुधारक, साधू किंवा जी समाजमान्य माणसे आहेत आणि ज्यांचे जगात लोकांनी पुतळे उभा केले. त्या सर्वांच्या जीवनाच्या तळाशी वाईटाचा अनुभव आहे किंवा दुःखाची अतिशय तीव्र वेदना आहे.
त्यामुळे आपल्या जीवनात ज्यावेळी एखादी वाईट घटना घडते किंवा पराकोटीचे दुःख भोगण्याची वेळ येते, त्यावेळी परमेश्वराला आपल्याकडून काहीतरी चांगले करण्याची अपेक्षा आहे. असा अर्थ यातून ज्या व्यक्तीला काढता येतो, त्या व्यक्तीला आपल्या जीवनात दुःखातून किंवा वाईटातूनही चांगली दिशा स्पष्ट दिसते.
पुण्यश्लोक अहिल्या मातेच्या जीवनात आलेले तारुण्यातील वैधव्य आणि रक्ताच्या नात्यातील बावीस लोकांचा डोळ्यासमोर झालेला मृत्यू, यातून त्यांचे दिव्य चरित्र प्रकट झाले.
राष्ट्रमाता जिजाऊ आईसाहेब यांचे वडील आणि भाऊ रक्षाबंधनाच्या दिवशी मारले जाणे, खंडागळ्यांच्या हत्तीवरून झालेल्या वादात वीर आणि शूर असलेले स्वतःचे बंधू आणि दीर यांचा आपापसात लढून घात होणे, या तीव्र वेदनेतून स्वराज्याचे स्फुल्लिंग त्यांच्या मनात प्रगट झाले.
जगद्गुरु तुकोबारायांच्या जीवनात पराकोटीचे वैराग्य निर्माण होण्यासाठी दुष्काळात त्यांच्या पत्नीचे व मुलाचे निधन होते , विश्व माऊली ज्ञानदेवांच्या जीवनात आई-वडिलांचा देहांत प्रायश्चित्ताचा प्रसंग, अशी कितीतरी उदाहरणे आपल्याला जगात पाहायला मिळतात.
आपल्या जीवनात आलेल्या दुःखद प्रसंगात आणि वाईट काळात सकारात्मक अर्थ आपल्याला काढता आला पाहिजे. दुःखाला गोंजारत बसणारी माणसे, परत परत दुःख आठवून रडत बसणारी माणसे कधीच दुःखातून बाहेर निघत नाहीत. त्यांच्या जीवनात वाईट काळाचा आणि दुःखाचा नकारात्मक अर्थ निघतो आणि ती पूर्ण खचून जातात आणि नैराश्येच्या गर्तेत गुंतून जातात.
ज्यांना अशा काळात सकारात्मक अर्थ काढता येतो, त्यांचे जीवन दिव्य तेजाने उजळून निघाल्याशिवाय रहात नाही. आपल्या अंतःकरणातील चैतन्याला तेज रूपाने प्रगट होण्यासाठी अंधःकारायची गरज असते, त्यासाठी जीवनात दुःख आणि वाईट काळाच्या वेदना येत असतात. कोणाच्याही अंतःकरणात कर्तुत्वाची आणि दिव्यत्वाची ठिणगी पेटण्यासाठी काहीतरी विपरीत, आपल्याला अडचणीत आणणारे घडावे लागते, हे ईश्वराचे नियोजन आहे. याला ईश्वरी वरदान म्हणून स्वीकारावे, मग आपल्या जीवनात नैराश्य यायलाच घाबरले पाहिजे.
चाले हे शरीर कोणाचिये सत्ते l कोण बोलवितो हरिविण ll
देखवी ऐकवी एक नारायण l तयाचे भजन चुकू नका ll
ईश्वरी नियोजन जसे आहे, तसे स्वीकारा , त्याच्यात लुडबुड केली, तर नुकसान आपलेच होते.
आले देवाचिये मना l तेथे कोणाचे चालेना ll
हरिश्चंद्र ताराराणी l वहातसे डोंबाघरी पाणी ll
पांडवांचा सहकारी l राज्याहुनी केले दूरी ll
तुका म्हणे उगीच रहा l होईल ते सहज पहा ll
डॉ. आसबे ल.म.